’डमी’ कामगारांविरोधात हमालांकडून आज भुसार बाजारातील काम बंद   

माथाडी मंडळासमोर हमाल पंचायतीची सभा  

पुणे : माथाडी हमालांचे नाव वापरून माथाडी मंडळात अनोंदीत व डमी हमाल कामाला लावून फुकट पैसे खाण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा कामगारांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज (गुरूवारी) भुसार बाजारातील काम बंद ठेवण्याचा निर्णय हमाल पंचायतने घेतला आहे. 
 
भुसार बाजारात डमी व अनोंदीत कामगार नको अशा तक्रारी व्यापार्‍यांकडून हमाल पंचायतीला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन हमाल पंचायतीने आज पासून भुसार विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आज सकाळी माथाडी मंडळासमोर सकाळी ११ वाजता हमाल पंचायतीची जाहीर सभा होणार आहे. फुकट खाऊ आणि खंडणीखोराविरुद्ध हमाल पंचायतने सातत्याने आवाज उठवला आहे. मात्र गेल्या काही काळापासून मुख्य धान्य बाजारात असलेल्या भुसार बाजारातील अशा कामगारांना इशारा देऊनही हे प्रकार थांबत नाहीत. पुणे माथाडी मंडळ आणि पोलीस प्रशासन त्यांच्यावर अद्याप परिणामकारक कारवाई करू शकले नाही. त्यामुळे भुसार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पंचायतीचे सरचिटणीस गोरख मेंगडे त्यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू करण्यात आले आहे. 
 
हमाल पंचायतीच्या वतीने अनोंदीत कामगारांविरोधात मार्केटयार्ड पोलीस ठाणे, पुणे माथाडी मंडळ येथे वारंवार लेखी तक्रारी देऊन, पोलीस तक्रारी नोंदवून संबंधितांवर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. तरी फुकटखाऊ आणि अनोंदीत, डमी कामगारांचे धाडस वाढत चालले आहे. तसेच आत्महत्या करण्याची धमकी देऊन आपल्या विरुद्ध तक्रार करणार्‍या हमाल पंचायतीच्या पदाधिकार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस विभागावर दबाव आणत आहेत. बुधवार पासून सुरू झालेल्या उपोषणात मेंगडे यांच्यासह हमाल पंचायतीचे सरचिटणीस विनोद शिंदे, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन पवार, पंचायतीचे उपाध्यक्ष अंकुश अवताडे, दत्तात्रय डोंबाळे, खजिनदार चंद्रकांत मानकर, संघटक विष्णू गरजे व संदीप मारणे, सहचिटणीस संदीप धायगुडे व अरुण डोलारे, व्यवस्थापक हुसेन पठाण, सल्लागार अंकुश शेलार, ट्रान्सपोर्टचे सभापती सुभाष मारणे, तोलणार विभाग प्रमुख किशोर भानुसघरे  धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. 

आंदोलन स्थगित करा 

गुळ-भुसार विभागातील अनोंदीत कामगारांवर कारवाई करण्यासाठी हमाल पंचायतने घेतलेल्या भूमिकेला दि पूना मर्चंटस् चेंबरचा पाठिंबा आहे. मात्र दि पूना मर्चटस् चेंबर आणि हमाल पंचायत यांच्या समन्वयाने या विभागातील काम चालत असते. त्यामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता काम बंद करणे योग्य नाही. बाजार समिती, मार्केडयार्ड पोलिसांच्या मदतीने अनोंदीत कामगारावर कारवाई करण्याचा आग्रह धरावा. मात्र बाजार बंद न करता या विभागातील कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे पत्र दि पूना मर्चटस्चे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी हमाल पंचायतीला दिले आहे. 

Related Articles